Home गोंदिया जिल्हा नवेगाव-नागझिरा अभियारण्यात एनटी-३ वाघीण भरकटली

नवेगाव-नागझिरा अभियारण्यात एनटी-३ वाघीण भरकटली

66
0

तिन दिवसापूर्वी सोडण्यात आली होती

गोंदिया : वाघांचे संवर्धन व स्थानांतरण उपक्रमांतर्गत नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ वाघीण कॉलर आयडी लावून सोडण्यात आली होती. मात्र ही या वाघिणीने लावलेला कॉलर आयडी काढून टाकून सोडलेल्या क्षेत्रातून दुसरीकडे भरकटल्याची बाब शनिवारी (दि. १३) रात्री उघडकीस आली. त्यामुळे या भरकटलेल्या एनटी- ३ वाघिणीचा शोध घेण्यासाठी वन्यजीव विभागाची चमू शनिवारपासून सक्रिय झाली आहे. तर यापूर्वी सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण आधीच भरकटली असून तिचा अद्यापही शोध लागलेला नाही.
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन व स्थानांतरण उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात २० मे २०२३ रोजी दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. तर याच प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील एनटी-३ वाघीण सोडण्यात आली. या वाघिणीला नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले. या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यापूर्वी सॅटेलाइट, जीपीएस कॉलर आयडी लावण्यात आली आहे. या माध्यमातून या वाघिणीच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवली जात होती. पण १२ एप्रिलपासून एनटी-३ वाघिणीचे लोकेशन एकाच ठिकाणी दाखवीत होते. त्यामुळे नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्र अधिकारी यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी लोकेशन दाखवीत असलेल्या परिसरात जाऊन पाहणी केली असता एनटी-३ वाघिणीला लावलेला कॉलर आयडी तिथेच पडून असल्याचे आढळला.
तर कॉलर आयडी सापडलेल्या परिसरात कुठलीही शिकार झाल्याचे आढळले नाही. तर एनटी-३ वाघिणीचासुद्धा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे व्हीएचएफ चमू आणि क्षेत्रीय अधिकारी शनिवारी (दि. १३) पासून एनटी-३ वाघिणीचा शोध घेत आहेत.

आधीची सापडेना आता दुसरीचा शोध घेण्याची वेळ

नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षी २० मे रोजी दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. यापैकी पहिली वाघीण तीन-चार दिवसांतच भरकटली. या वाघिणीने गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून थेट मध्य प्रदेशातील जंगलात धाव घेतली. या परिसरात या वाघिणीने जनावरांची शिकारसुद्धा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटला तरी या वाघिणीचा पत्ता लागला नाही. त्यात आता तीन दिवसांपूर्वी सोडलेली एनटी-३ वाघीण भर- कटल्याने वन्यजीव विभागासमोर तिला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.