गोंदिया : जिल्ह्यात मोदी आवास योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. यानुसार लाभार्थ्यांनी अर्जही केले. पात्र लाभार्थ्यांना योजना मंजूर होऊन पहिल्या हप्त्याचा निधीही मिळाला. यामुळे लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरूवात केली. परंतु, दुसरा हप्ता रखडल्याने लाभार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भर पावसाळ्यात लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाने याची दखल घेऊन रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री धनंजय रिनायत यांनी केली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काचे मजबुत घर मिळावे, याकरीता मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ देण्यात येतो. योजनेचा लाभ मिळावा, याकरीता गावागावातील नागरिकांनी अर्ज केला. पात्र लाभार्थ्यांची निवड करून योजनेतंर्गत घरकूल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यात आला. यामुळे लाभार्थ्यांची घर बांधकाम सुरूवात केली. परंतु, अनुदानातंर्गत देण्यात येणारा दुसरा हप्ता अडकल्याने कोंडी झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून लाभार्थी दुसर्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. परंतु, अद्यापही अनुदान मिळणार, अशी शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात घरकूल लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. अनेकांचे घर बांधकाम सुरू असल्याने उघड्यावर संसार थाटला आहे. निर्धारित वेळेत घराचे बांधकाम पूर्ण होणार, अशी अपेक्षा होती. परंतु, मोदी आवास योजनेच्या दुसर्या हप्त्याचा निधी अडकून पडल्याने लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून लवकरात लवकर दुसर्या हप्त्याचा निधी लाभार्थ्यांना देण्यात यावा, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री धनंजय रिनायत यांनी केली आहे.
जनप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
मोदी आवास योजनेतंर्गत दुसर्या हप्त्याचा निधी अडकून पडला आहे. यामुळे लाभार्थ्यांची कोंडी झाली. तर दुसरीकडे घराचे बांधकाम ठप्प पडले आहे. अशात लाभार्थी दुहेरी संकटात सापडला आहे. या बाबीची दखल घेवून आ.विजय रहांगडाले, आ.विनोद अग्रवाल व आ.परिणय फुके यांनी पुढाकार घेवून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी धनंजय रिनायत यांच्यासह लाभार्थ्यांनी केली आहे.

