हलबीटोला येथील घटना
गोंदिया : दारू ही मनुष्याला त्याच्या गर्तेत नेऊन सोडते. ध्यानीमनी नसताना विश्रांतीच्या वेळी आपल्या अंगावर कलह येईल याची किंचितही कल्पना नसलेल्या वडिलाने चक्क दारुड्या मुलाचा खून केला. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री ११:३० वाजेदरम्यान हलबीटोला-खमारी येथे घडली. उमेश खोमराज प्रधान (३१, रा. हलबीटोला), असे मृत मुलाचे नाव आहे.
उमेश प्रधान मद्याच्या आहारी गेला होता. अनेक दिवसांपासून तो दारू पिऊन आई-वडिलांना त्रास द्यायचा. शनिवारी (दि. १३) मद्य प्राशन करून तो रात्री घरी आला व वडील खोमराज अनंतराम प्रधान (६४, रा. हलबीटोला खमारी) यांच्याशी भांडण सुरू केले. या भांडणात उमेश वडिलांना मारण्याच्या तयारीत असताना वडील खोमराज यांनी आपल्या बचावासाठी घरातील कुन्हाड आणली आणि मुलाच्या डोक्यात हाणली. त्याच्या डोक्यावर कुन्हाडीने दोन घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेसंदर्भात ग्रामीण पोलिसांनी ज्ञानेश्वर दयाराम धोटे (४०) यांच्या तक्रारीवरून आरोपी खोमराज प्रधान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.




