सालेकसा : वन विभागाच्या पथकाने सालेकसा वनपरीक्षेत्रांतर्गत ग्राम लोधीटोला येथील एका घरावर धाड घालून तेथून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड व चिरान जप्त केले. रविवारी (दि.२१) सकाळी ८ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासोबत कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.२१) सकाळी ८ वाजेदरम्यान सालेकसा राउंडमधील सालेकसा आमगाव खुर्द, पिपरिया या बिटात पायदळ गस्त केली. तसेच, महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमावर्ती भागात सालेकसा रेंजमधील वनरक्षक व वनपालांनी मिळून सामूहिक गस्त करण्यात आली. या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ग्राम लोधीटोला येथील रहिवासी हेमराज मानकर याच्या घराची, तसेच आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली. यामध्ये पथकाला अवैध तोडीची सागवान प्रजातीची लाकडे व सागवान चिरान मिळून आले. पथकाने मोक्यावर जप्ती प्रक्रिया पूर्ण करून वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




