Home गोंदिया जिल्हा काळविटांसाठी कर्दनकाळ ठरतोय वनविभाग

काळविटांसाठी कर्दनकाळ ठरतोय वनविभाग

54
0

गोंदिया : पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्वत्र व्यापक स्वरूपात उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु गोरेगावचा वनविभाग काळविटांचे अधिवास संपविण्यासाठी कुरण नष्ट करीत आहे. तालुक्यातील ग्राम चिल्हाटी ते गिधाडीदरम्यान असलेल्या ७५ हेक्टर जमिनीपैकी केवळ ५ हेक्टर जमीन कुरणासाठी ठेवण्यात आली आहे. उर्वरित जागेवर रोपटे लावल्याने काळविटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यांतील जंगल परिसरात काळवीटची संख्या १८० पेक्षा अधिक आहे. मानेगाव येथे काळवीट व चितळांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे काळविटांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. येथील माळरानात काळविटांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. मात्र, जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. परिणामी, दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५च्या दरम्यान होती. परंतु, ती संख्या आता १५० ते १८०च्या घरात गेली आहे. गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील काळविटांचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिधाडी येथील ७५ हेक्टर कुरण असलेल्या ७० हेक्टर जागेवर वनविभागाने रोपटे लावले आहेत. ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वनविभागाने वन्यजीवांची पर्वा न करता रोपटे लावले आहे. ७५ हेक्टर पैकी फक्त ५ हेक्टर क्षेत्र या कुरणासाठी शिल्लक ठेवले आहे. परिणामी, काळविटांचा अधिवासा संपुष्टात येत असल्याने कुरणात राहणाऱ्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.