गोंदिया : मध्यप्रदेश सरकारने ‘लाडली बहन योजना’ सुरू केली. ही योजना राज्यातही सुरू करावी, अशी मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी केली. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांची भेट घेवून निवेदन दिले. नजिकच्या मध्यप्रदेश राज्यात ‘लाडली बहन योजना’ची अंमलबजावणी सुरू आहे. योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची ठरली आहे. योजनेतंर्गत महिला सक्षमीकरण, गरोदर महिलांना पौष्टिक आहार या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. गर्भवती महिलांना पौष्टिक आहाराची नितांत गरज असते जेणेकरून मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण नष्ट व्हावे व आई आणि बाळ दोघेही निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे राज्यातही अशाप्रकारे योजना सुरू करण्यात यावी, यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी तत्परता दाखवून कैबिनेट बैठक पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व मागणीचे निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विचार करणार, अशी ग्वाही दिली.

