रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाचे पीक निघण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच धानाच्या फुलोऱ्यावर मानमोडीने हल्ला केला आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. हाती – येणारे पीक मानमोडीमुळे निसटू नये – यासाठी शेतकऱ्यांना आता अतिरिक्त – पैसे खर्चुन कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. गोंदिया तालुक्यातील ग्राम कामठा, झिलमिली, पांजरा, छिपीया, रावणवाडी, मुरपार परिसर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. धानाला किटकांपासून वाचविता यावे यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी केली आहे. यासाठी शेतकऱ्याला एकरी १५०० रुपये खर्च येतो. मात्र यंदा कित्येकदा वातावरणातील बदलामुळे रब्बीतील धान पिकाला प्रकारचे कीटक शिकार बनवित आहेत. अशात पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना कीटकनाशकावर अतिरिक्त खर्च येत आहे. धान पीक फुलोऱ्यावर आले असून शेतकरी यंदा चांगले उत्पादन येणार अशी आशा लावून बसले होते. हाती येणाऱ्या पिकांवर मानमोडीने हल्ला चढवून नुकसान सुरू केले आहे. यामुळे शेतकरी चिंतित दिसून येत असून पिकांना वाचविण्यासाठी परत एकदा कीटकनाशकाची फवारणी करीत आहे. यंदा उन्हाळा व त्यात अवकाळी पावसामुळे धान पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे व त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे.




