अठराव्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगा
दिव्यांग व वरिष्ठ मतदारांनीही उत्साहात केले मतदान
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.१२ टक्के मतदान
गोंदिया : अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक ६०.४ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले तर सर्वात कमी ४५.७९ टक्के मतदान अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्रात झाले. तसेच तुमसर विधानसभा मतदारसंघात ५८.९४ टक्के, भंडारा विधानसभा क्षेत्रात ५६.७७ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ५६.६९ टक्के व गोंदिया विधानसभा क्षेत्रात ५६.११ टक्के मतदान झाले. या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विधानसभा निहाय झालेल्या मतदानानुसार एकूण ५६.१२ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. नवमतदारांसह युवक, वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनीही सकाळच्या सुमारास मतदानात उत्साहाने सहभाग नोंदविला. दुपारी १२ वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी दिसून आली. दुपारी ३ वाजेनंतर मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अजुर्नी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदार संघात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत, तर गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती.
विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान : तुमसर मतदारसंघात १ लाख ७८ हजार ६९२ मतदारांनी मतदान केले. यात ९१ हजार ३२ पुरुष व ८७ हजार ६५९ महिला मतदार असून १ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. भंडारा मतदारसंघात २ लाख १० हजार ११ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख ७ हजार ६४३ पुरुष व १ लाख २ हजार ३६६ महिला मतदार असून २ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. साकोली मतदारसंघात १ लाख ९५ हजार ५६७ मतदारांनी मतदान केले. यात ९७ हजार २१७ पुरुष व ९८ हजार ३५० महिला मतदाराचा समावेश आहे. अजुर्नी मोरगाव मतदारसंघात १ लाख १६ हजार २६९ मतदारांनी मतदान केले. यात ५७ हजार ६२१ पुरुष व ५८ हजार ६४८ महिला मतदाराचा समावेश आहे. तिरोडा मतदारसंघात १ लाख ४९ हजार ७२० मतदारांनी मतदान केले. यात ७३ हजार ९९७ पुरुष व ७५ हजार ७२३ महिला मतदाराचा समावेश आहे. गोंदिया मतदारसंघात १ लाख ७५ हजार १८७ मतदारांनी मतदान केले. यात ८७ हजार ६७१ पुरुष व ८७ हजार ५१५ महिला मतदार असून १ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.





