गोंदिया : शहरातील रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात आज, सोमवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात तथाकथीत युवा नेत्यांचे अनधिकृत होर्डींग लागले असून या होर्डींगमुळे दुसरीकडून येणारे दिसून येत नाही. त्यातच सहयोग हाॅस्पीटलच्या बाजूने असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेऊन अर्धा रस्ता व्यापला जातो. त्यामुळे सुध्दा रहदारीला त्रास होत असतो. गेल्या काही दिवसापुर्वीच शरद पवार राष्ट्रवादी गटाने रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतुक विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतरही विभागाला जाग आली नाही. आज त्या परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका विद्यार्थीनीला चिरडल्याने नागरिकांत मोठा असंतोष दिसून येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर अवैध होर्डींग लावणारे व वाहने ठेवणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

