गोंदिया : पुणे येथे मुख्यालय असलेल्या डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड या ट्रस्टमार्फत महाराष्ट्र भरात 61 हजार फळ झाडांचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यात वाटप करण्यात आले. गोंदिया येथून शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात तीन हजार फळ झाडांचे वाटप होणार आहे. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात 61 हजार झाडे वाटपाचा ट्रस्टने विडा उचलला आहे. मुंबई येथे व्दारका पिठाचे शंकराचार्य स्वामी प्रद्यानंद सरस्वती महाराज आणि रस्ते विकास महामंडळाचे एमडी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. लिंबू, पेरू, आंबा, आवळा, डाळिंब, सीताफळ अशा विविध फळ झाडांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात ऋतू मानानुसार वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वातावरणास पोषक असणारे फळझाडे देण्यात येत आहे. फळझाडे जगविणाऱ्या दाम्पत्याला वर्षाला पाचशे रूपये मानधन आणि घरातील महिलेचा ट्रस्ट तर्फे साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ट्रस्टच्या पुणे कार्यालयातून झाडाबाबत माहिती घेऊन संपर्क ठेवला जाणार असल्याचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे, महेश चौहान यांनी सांगीतले.

