वेळेवर हजर राहत नसल्याने रूग्णांची गैरसोय
मुल्ला आरोग्य केंद्रातील प्रकार
देवरी : शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करून कुटूंब नियोजनाला बळ देण्याचे काम केले जात आहे. यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना टार्गेट दिले जाते. परंतु, शासनाच्या उद्देशाला जबाबदारी असलेले डॉक्टरच हरताळ फासत आहेत. असाच प्रकार मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रूग्णांना परत जाण्याची वेळ आली आहे. वेळ देऊन स्वत: डॉक्टरच अनुपस्थित राहत असल्याने रूग्णांना प्रतिक्षा करीत तत्काळ रहावे लागत आहे.
मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्र देवरी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र आहे. केंद्रातंर्गत येणार्या गावांतील नागरिकांना सर्व सोयी-सुविधायुक्त आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. परंतु, असे दिसून येत नाही. कुटूंब नियोजन उपक्रम राबविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. यासाठी आरोग्य संस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांना उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्यानुसार कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास इच्छूक रूग्णांना दिवस ठरवून वेळ दिले जाते. परंतु, वेळ देऊन डॉक्टरच अनुपस्थित राहत असल्याने रूग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. १३ एप्रिल रोजी जवळपास १२ ते १५ जणांना आरोग्य संस्थेत हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, डॉक्टरच अनुपस्थित असल्याने रूग्णांना तत्काळ प्रतिक्षा करावी लागली. जवळपास ४ वाजता सुमारास आरोग्य संस्थेत डॉक्टर दाखल झाले. यावरून मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे का? असा प्रश्न संतप्त रूग्णांकडून उपस्थित केला जात आहे.




