गोरेगाव : तालुक्यातील तेलनखेडी या गावशिवारात असलेली माताबोडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जनतेसाठी धोकादायक ठरू लागली आहे. बोडीच्या परिसरातून नागरिकांचे येणे-जाणे कठीण झाले आहे.
तालुक्यातील तेलनखेडी गाव शिवारात माताबोडी आहे. मात्र स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीकोणातून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बोडीचे परिसर जंगल स्वरुपात आले आहे. बोडीच्या परिसरात वाढलेली झाडीझुडपी हिंसक प्राण्यांसाठी पोषक ठरत आहे. त्याच बरोबर बोडीला लागून काही घरे आहेत व लहान-मोठ्यांची परिसरात वर्दळ असते. ही बोडी मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. विशेष म्हणजे काही अंतरावर अंगणवाडी केंद्र आहे. या केंद्रात येणार्या चिमुकल्यांसाठी बोडी लगतचाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
…………
सौंदर्याच्या दृष्टीकोणातून आकर्षक
एकेकाळी तुमसर येथील माताबोडी सौंदर्याच्या दृष्टीकोणातून आकर्षक ठरायची. मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हे बोडी परिसर आजघडीला धोकादायक ठरले आहे. झाडी-झुडपींचे कुंपण झाले आहे. या परिसरात लहान मुले खेळत असतात. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण रहाणार, असा प्रश्न गावकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.




