तिरोडा : तालुक्यातील ठाणेगाव येथील चिन्मय गिरीष बन्सोड याने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालात चिन्मय याने ८९३ वी रँक मिळवित परीक्षा उत्तीर्ण केली.
स्पर्धा परीक्षा सर करून प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून चिन्मय बन्सोड याने अविरत परिश्रम घेतले. त्याचे परिश्रम फलित झाले असून ८९३ वी रँक मिळवित चिन्मय बन्सोड याने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. चिन्मयने वर्ग १ ते ३ पर्यंतचे प्राथमिक शिक्षण धुळे येथे झाले. तर वर्ग ४ ते १० पर्यंतचे शिक्षण सरस्वती हायस्कूल नागपूर व वर्ग १२ वी पर्यंतचे शिक्षण शिवाजी सायन्स कालेज नागपूर येथे झाले. त्यानंतर बी.टेक मकेनिकल इंजिनिअर व्हीएन आयटी नागपूर येथून केलेले होते. त्याने युपीएससी परीक्षेच्या तयारी करण्याच्या दृष्टिने घरीच राहून नियमित अभ्यास करून ही परीक्षा पास केली. चिन्मयच्या यशाबद्दल तिरोडा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.




