गोंदिया : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडावे, यासाठी गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हे प्रवृत्तींच्या लोकाविरूध्द कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान तिरोडा शहरातील दोन सर्राइत गुन्हेगाराविरूध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांनी पोलिस विभागाच्या प्रस्तावा शिक्कामोर्तब करून दोन्ही गुंड्याना एक वर्षाकरीता कारागृहात डांबण्याचा आदेश दिले आहे. धीरज प्रकाश बरईकर (३६) रा.संत रविदास वार्ड तिरोडा, अनमोल महादेव घोडीचोर (४१) रा.संत सज्जन वॉर्ड तिरोडा असे कारवाई झालेल्या गुंडाची नावे आहेत.
तिरोडा येथील अनमोल महादेव घोडीचोर व धीरज प्रकाश बरईकर हे दोन्ही गुंड प्रवृत्तीचे आहेत. या दोन्ही विरूध्द तिरोडा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. अनेकदा दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यांचे चारित्र आणि मनोवृत्तीत कसलाही बदल व सुधारणा झालेली नाही. हे दोन्ही गुन्हेगार अवैध दारूविक्री मादक पदार्थ अशा आदि अवैध व्यवसाय करतात. या दोन्ही गुंडामुळे तिरोडा शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने तिरोडा पोलिसांनी दोन्ही गुंडाची कुंडली तयार करून एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. दोन्ही गुंड प्रवृत्तीची पार्श्वभुमी लक्षात घेत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी एमपीडीए अंतर्गत दोन्ही गुन्हेगारांना एक वर्षाकरीता कारागृहात डांबण्याचे आदेश पारीत केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश लबडे, तिरोडाचे ठाणेदार देविदास कठाडे यांच्या नेतृत्वात सपोनि विजय शिंदे, पोउपनि वनिता सायकर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, भुवनलाल देशमुख, मेवालाल भेलावे, कोडापे, इंद्रजित बिसेन, पोउपनि चिरंजीव दलालवाड, विजयकुमार पुंडे, रोशन सांडेकर, मनोहर अंबुले, देविदास तुरकर, कैलाश ठाकरे, सुर्यकांत खराबे, धनंजय बरई, निलेश ठाकरे, सिध्दार्थ गणवीर, गोसावी यांनी केली.
………………
एक आरोपी शिक्षा भोगलेला तर दुसरा तडीपार
तिरोडा येथील अनमोल घोडीचोर हा सर्राइत गुन्हेगार आहे. या आरोपीविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान एका गुन्ह्यात अनमोल घोडीचोर याला १६ वषार्ची शिक्षा सुध्दा झाली आहे. तर दुसरा आरोपी धीरज बरईकर हा सुध्दा अवैध दारूविक्री, गांजा विक्री असे अवैध व्यवसायात गुंतलेला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षकाकडून धीरज बरईकर याच्याविरूध्द सहा महिने तडीपाराची कारवाई करण्यात आली होती. धीरज हा गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार देखील राहिला आहे. अशा शिक्षा भोगल्यानंतरही दोन्ही आरोपींच्या गुन्हे प्रवृत्तीत कसलेही बदल घडून आले नाही. जनतेत दादा म्हणून आपली ओळख व प्रतिमा तयार करून धाकपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे काम सतत करायचे. त्यामुळे गोंदिया व तिरोडा पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांची कुंडली तयार करून एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते. या कारवाईमुळे तिरोडा शहरासह तालुक्यातील स्वयघोषीत गावगुंड व दादांचे धाबे दणाणले आहेत.




