देवरी : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत लिपीकाचा मृतदेह फांसावर टांगलेला आढळला. यामुळे देवरी शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना (ता.१३) सायंकाळी ५ वाजता सुमारास उघडकीस आली. संजय मानकर (४५) रा.प्रभाग क्र.१७ देवरी असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे देवरी शहरात उलटसुलट चचेर्ला पेव फुटले आहे.
सविस्तर असे की, देवरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत संजय मानकर हा लिपीक पदावर कार्यरत होता. (ता.१३) सकाळी ७ वाजता सुमारास नेहमीप्रमाणे संजय घरून निघाला. दरम्यान संजयच्या कुटूंबीयांनी कार्यालयात गेला असावा, असा अंदाज बांधला. मात्र दुपारपर्यंत त्याचा सुगावा लागला नाही. यामुळे शोध मोहिम राबविण्यात आली. त्यातच संस्थेचे सचिव मेळे यांच्याशी संपर्क साधून संजय कार्यालयात उपस्थित आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर संजय हा कार्यालयात आला नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संजय याचा शोध घेणे सुरू केले. संस्थेच्या गोडावून जवळ असलेल्या चौकीदाराच्या विश्रांती कक्षात ५ वाजता सुमारास त्याचा मृतदेह फासावर टांगलेला आढळला. त्यामुळे संजय मानकर याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी? असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय मानकर याच्या मृतदेह आणि घटनास्थळावरील भौतिक परिस्थिती लक्षात घेत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. पोलिसांच्या तपासानंतर आत्महत्या की घातपात या बाबीचा उलगडा होणार, असे बोलले जात आहे.




