गोंदिया : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांत तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद 20 ऑगस्ट रोजी करण्यात आली. सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी खडकी येथील करिष्मा दीपक चुटे (26) या तरुणीने 17 ऑगस्ट रोजी पहाटे 2.30 वाजता विष प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारानंतर प्रकृती खालावल्याने गोंदिया येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनेप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दुसरी घटना गोंदिया तालुक्यातील आसोली येथील असून दिलीप योगदास मेश्राम (43) हा 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता घरी कोणालाही न सांगता घरून निघून गेला होता. 19 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता बटाना पांगोली नदीच्या कोल्हापुरी बंधार्याच्या काठावर तो मृतावस्थेत आढळला. निकिता दिलीप मेश्राम रा. कुडवा यांच्या तक्रारीवरून गोंदिया पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसरी घटना आमगाव तालुक्याच्या बाम्हणी येथील रेल्वे फाटकावर 20 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. प्रमोद उरकुडा ठाकरे (45) यांना रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेसंदर्भात केशव प्रमोद ठाकरे (20) रा. बाम्हणी यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

