मुलींनीच मारली बाजी : उर्वशी दिघोरे द्वितीय तर मौसमी जैतवार जिल्ह्यातून तृतीय
गोंदिया : आज जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. कोकण विभागाने 99.01 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 94.73 इतका लागला. गोंदिया जिल्ह्याने यावेळीही चांगली कामगिरी करत चांगले गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील विवेक मंदिर इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी रिया रोशन गेडाम हिने 98.60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच चंचलबेन एम. पटेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी उर्वशी सुनील दिघोरे ही 98.40 टक्के गुणांसह जिल्ह्यात दुसरी आली असून याच शाळेची मौसमी मुनेश्वर जैतवार हिने 98.20 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. विवेक मंदिर इंग्लिश स्कूलचे 93 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 40 विद्यार्थ्यांनी 90 आणि 90 पेक्षा जास्त गुण मिळवून विक्रम केला आहे. येथील परीक्षेचा महाविद्यालयाच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालात पलक शर्मा ही जिल्ह्यातील पहिली टॉपर ठरली आहे. तसेच लावण्य एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित चंचलबेन एम. पटेल शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र फुंडे यांनी सांगितले की, शाळेतील 78 विद्यार्थी इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त तर 38 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
रियाला व्हायचे प्रशासकीय अधिकारी!
इयत्ता दहावीच्या परीक्षेत विवेकमंदीर शाळेची विद्यार्थिनी रिया रोशन गेडाम 98.60 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली. आय. आय. टी. मधून अभियंता होवून पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचा मानस रियाने व्यक्त केला आहे. रियाशी बोलणे केले असता तिला जिल्ह्यात प्रथम येण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. सुरवातीपासून अभ्यासावर विशेष भर दिला. कोणता ताण न घेता सहा ते सात नियमित अभ्यास केल्याचे रियाने सांगितले. मोठी बहिण आर्याला सुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे कौटुंबिक यशाची परंपरा कायम ठेवण्याचा मानस असल्याचे देखील रिया म्हणाली. रियाचे वडील, मोठे वडील शिक्षक असून आजोबा सुद्धा सेवानिवृत्त शिक्षक आहेत. घरात एकूणच शैक्षणिक वातावरण आहे. यश संपादन करण्यासाठी विशेष म्हणजे मुख्याध्यापक अशोक कारता, मुख्याध्यापिका डॉ. भावना माहुरे, योगेश शुक्ला, संगीता निगुडकर, रिता वराडे, उषा भगत, जैन मॅडम, राव सर यांनी तथा शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश संपादन करता आले. शाळेतील मार्गदर्शनासह ट्यूशनमधील नोट्स आणि नरेंद्र मेश्राम सर याचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले असल्याचे रियाने भेटीदरम्यान सांगितले. आपल्याला यशाचे श्रेय रियाने शिक्षकांसह वडील रोशन गेडाम, आई विशाखा गेडाम, मोठे वडील सुनील गेडाम, मोठी आई शालिनी गेडाम, आजोबा धार्मिक गेडाम, मामा अतुल गजभिये, आत्या प्रतिभा गणवीर, आणि काका विनोद गेडाम यांना दिले. तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

