Home Uncategorized नवेगावबांध- गोठणगाव मार्गावरील पूल खचल्याने वाहतूक बंद; अनेक गावांचा संपर्क तुटला

नवेगावबांध- गोठणगाव मार्गावरील पूल खचल्याने वाहतूक बंद; अनेक गावांचा संपर्क तुटला

90
0

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील नवेगावबांध- गोठणगाव या मुख्य मार्गावरील तलावाजवळील पूल 1 ऑगस्टच्या रात्री 10 वाजेच्या दरम्यान खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे एसटी बसेससह इतर प्रवासी वाहनांची ये- जा बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर या मार्गाची वाहतूक नवेगावबांध- कवठा- कालीमाती वरून गोठणगावकडे वळविण्यात आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वरून गोठणगाव- केशोरी मार्गे गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या या राज्य महामार्गावरील गोठणगाव तलावाजवळील पूल 1 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान पूर्णतः कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने एका चारचाकी वाहनातील दोन ते तीन जणांचा जीव वाचला.या मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असते. गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाचे रुंदीकरन मंजूर होऊनही रस्ता बांधकामात वन विभागाने आडकाठी धोरण घेतल्यामुळे प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन जनतेला दिले. मात्र ते आश्वासन हवेतच विरले. परिणामी, या पद्धतीच्या घटना आणि त्या घटनांमध्ये लोकांचा जीव गेल्यानंतर शासन रस्ता बांधकामाला परवानगी देणार कां? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या मार्गावर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान व व गोठणगाव येथील इटियाडोह धरण तथा प्रतापगड येथील तीर्थस्थानावर जाणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. धार्मिक आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रोडने वाहतूक चालू असते. प्रवाशांनी नवेगावबांध- कवठा- कालीमाती- गोठणगाव या मार्गे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब हा पूल उभा करून इतरही पूल व नव्याने रस्त्याचे रुंदीकरणाला सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.