• 25 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे
गोंदिया, दि.17 : स्पर्धापूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याने प्रामुख्याने आदिवासी बहुल परिसरात महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केलेली आहे. स्पर्धापूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र देवरी कार्यालयामार्फत माहिती व मार्गदर्शन दिल्या जाते. देवरी येथील प्रशिक्षण केंद्र जानेवारी 1986 पासून कार्यान्वित आहे.
सदर कार्यालयाचे स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे सन 2025-26 पहिले सत्र दि.1 एप्रिल ते 15 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसह देवरी कार्यालयास 25 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावे.
प्रशिक्षणार्थ्यांची शैक्षणिक व इतर पात्रता : सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान एस.एस.सी. उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक पात्रताधारक व टंकलेखक/संगणक/लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. उमेदवार हा आदिवासी जमाती प्रवर्गातील असावा, यासाठी स्त्री अथवा पुरुष दोन्ही पात्र असतील. उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार हा गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यापैकी रहिवासी असावा. उमेदवाराने सदर प्रशिक्षणाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराजवळ रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असावे. बँकेत खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची व आधारकार्डची छायाप्रत सोबत जोडावी.
प्रशिक्षण कालावधी : सदर योजनेंतर्गत प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस म्हणजेच दि.1 एप्रिल ते 15 जुलै 2025 असा असेल. निवड प्राप्त उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागेल.
विद्यावेतन : प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देय राहील. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी देवरी यांनी कळविले आहे.
