केशोरी परिसरात पावसाचा जोर कायम
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यात सतंतधार पावसाने इटियाडोह धरण भरल्यामुळे वेस्टवेअर तीन फुटापर्यंत निघत आहे. गाढवी नदी दुथळी वाहत असुन अनेक पुलावरुन पाणी वहात आहे. नदीलगतच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केशोरी- वडसा- खोळदा पूलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या आठवड्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधीक पाऊस अर्जुनी मोर. तालुक्यात पडत आहे. नदीनाले ओसंडून वाहत आहेत. तर तलाव बोड्या सह तालुक्यातील ईटियाडोह धरण, नवेगांवबांध जलाशय ओव्हरप्लो झाले आहेत. आजही तालुक्यात पुरपरिस्थिती आहे. तालुक्यातील आदिवासी नक्षलप्रभावीत अतीदुर्गम भाग असलेल्या केशोरी परिसरात आजही पुरपरिस्थीती कायम आहे. यावेळी पुर परिस्थितीचा आढावा आणि पाहणी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वनारे यांनी केली असुन खबरदारीचा उपाय म्हणुन आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे, वडेगाव बंध्या ग्रामपंचायतचे सरपंच घनश्याम शहारे, तलाठी राऊत, सामाजिक कार्यकर्ता विलास बोरकर, आरोग्य सेविका दूशीलाताई मांडवे, पोलीस पोलीस विभागाचे कर्मचारी कन्नाके, सुशील रामटेके,भांडारकर, हरिणखेडे आणि हेमंत बडवाईक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांना ये -जा कर करू नये करिता पोलीस कर्मचारी बसविण्यात आले. तसेच गावकऱ्यांच्या मदतीने पुरामध्ये कोणतीही हानी होणार नाही. याकडे लक्ष देऊन त्या पद्धतीने आखणी केली तसेच गाढवी नदीवर येणाऱ्या सर्व पुलांची पाहणी केली.

