श्री रामनवमी निमित्त जिल्हयात सर्वत्र शोभायात्रा
गोंदिया : चैत्र नवरात्रचा आज १७ एप्रिल रोजी शेवटचा दिवस राम जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात शहरासह जिल्ह्यात साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात भक्तिभावाचे वातावरण दिसून आले. दरम्यान गोंदिया शहरासह सर्व तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावागावात शोभायात्रा काढण्यात आली. शिवाय मंदिर परिसरासह विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे आज भक्तीभावाच्या वातावरणात जिल्हा प्रभू जय श्रीरामच्या जयघोषाने गजबजला होता. ढोलताशांचा गजर, भगवा ध्वज, डिजेची रंगबिरंगी रोषाणाई शोभायात्रेत सहभागी असलेल्या विविध आकर्षक झांकीनी लक्ष वेधले होते. भक्तगण प्रभू जयश्रीरामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते.
चैत्र नवरात्र उत्सवाला नऊ दिवसांपूर्वी सुरू झाली. जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. आज, चैत्र नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस रामजन्मोत्सवाची तयारीही जोमात सुरू होती. आज सकाळपासून प्रभू श्रीराम जन्मोत्सवासाठी जिल्ह्यात भक्तीभावाचे वातावरणच पहावयास मिळाले. मंदिरात भाविकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया शहरात दरवर्षीप्रमाणे भाविकांची एक विशिष्ट वेशभुषेत चहलपहल पहावयास मिळाली. गोंदिया येथील रामनगरातील श्रीराम मंदिर येथून राम जन्मोत्सव समितीच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता सुमारास विधीवत पुजनानंतर शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेने रामनगर, धोटे प्रेस, पाल चौक, काले खाँ चौक, उड्डाण पूल, नेहरू चौक, सिव्हील लाईन, छोटा गोंदिया, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, चावडी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक मार्गाने रॅलीने भ्रमण केले. दरम्यान, संपूर्ण शहर श्रीरामच्या जयघोषाने गजबजले होते. यात्रेत आकर्षक झांकी, देखावे, वेशभुषा साकारलेले कलावंत, वाजंत्र्यांना निनाद हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते. गोंदिया शहर प्रभु जय श्रीरामाच्या जयकाराने गजबजला होता. तर दुसरीकडे जिल्ह्यातील गावागावात आज प्रभु श्रीरामाचा जयघोष ऐकावयास आला.





