जिल्ह्यात कलम १४४ लागू
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे व ४ जून २०२४ रोजी भंडारा येथे मतमोजणी होणार असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ अंतर्गत मतदानाच्या दिवसापासून ४८ तास पूर्व प्रचार कार्यक्रम संपणार आहे. त्यानुसार ६३-अजुर्नी मोरगाव, ६४-तिरोडा, ६५-गोंदिया व ६६-आमगाव विधानसभा मतदार संघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले सर्व स्टार प्रचारक हे निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा मतदारसंघात राहिल्यास त्यांचेकडून प्रचार मोहीम राबविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार सहारे यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये खालील प्रमाणे प्रतिबंध आदेश पारीत केला आहे.
६४-तिरोडा व ६५-गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजे १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून आणि ६३-अर्जुनी मोरगाव व ६६-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजे १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपासून विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व संबंधित व्यक्ती तसेच निवडणूक प्रचार कार्यक्रमासाठी आलेले सर्व राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक यांना उपविभागाच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई असेल. परंतु ही अट दारोदारी निवडणूक प्रचार करण्यासाठी किंवा घरोघरी भेटीकरीता लागु राहणार नाही. मतदान संपण्याच्या ४८ तासामध्ये ध्वनीक्षेपणाच्या वापरावर पुर्णत: बंदी राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी. याबाबत सर्व उपविभागीय अधिकाºयांनी कलम १४४ ची अधिसूचना जारी केली आहे.




