सडक अर्जुनी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाटी बौध्द भूमी येथे बौध्द पौर्णिमेनिमित्त दोन दिवसीय तालुकास्तरीय उत्सव बौध्द विहारात थाटात संपन्न झाले. जगाला अहिंसा, मैत्री व शांततेचा संदेश देणारे महान कारुणीक तथागत भगवान बुध्द यांचे जयंतीचे औचित्य साधत तथागत भगवान बुध्दाची बौध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली. या दोन दिवसीय तालुकास्तरीय उत्सवाची कालीमाटी बौध्दभूमी येथील बौध्द विहारात थाटात साजरी करण्यात आली. पौर्णिमेच्या दिवशी सकाळ पासून बौध्द उपासक व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करुन तालुक्यातील अनेक गावाच्या बौध्द विहारातून विहारात असलेले भिक्षू यांनी कालीमाटी बौध्द विहाराला भेट दिली. यावेळी मुख्य मान्यवरांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून बौध्द वंदना पंचशील ग्रहण करण्यात आले. २२ मे ला रात्री ९ वाजे परित्राण पाठ करून २३ मे रोजी सकाळी ८ वाजे बाहेर गावारून आलेले उपासक व उपासिका यांनी बौध्द वंदना घेतली. यावेळी प्रथम खिरदान करून हजारो उपासकांना अल्पोहार देण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक रम्यस्थळी कालीमाटी बौध्द भूमी स्थळाला भेट देऊन बुध्दाच्या विचाराची शिदोरी घेऊन भगवान तथागत बुध्दांनी सांगितलेल्या शांतीच्या मार्गाने वागण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. यावेळी भंते बोधीपालो स्वती श्रामनेर सागर बोधी यांनी आलेल्या उपासकांना आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून धम्माची ज्योत सदैव तेवत ठेवण्याची प्रतिज्ञा दिली. त्यासाठी उपासक, उपासिकांना कटीबध्द राहण्यासाठी प्रेरित केले. या दोन दिवसीय तालुकास्तरीय उत्सवाला माजी मंत्री इंजी. राजकुमार बडोले, जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, ताराचंद नंदेश्वर, युवराज साखरे, अमन टेलर, अर्जुन डोंगरवार, विनायक नंदेश्वर, गजघाटे, हरीकिसन टेंभुर्णे, भालाधरे, तागडे, ग्रामसेवक जनबंधू, कविता जनबंधू, सुमन मेश्राम, पौर्णिमा मेश्राम, दानेश साखरे, डाॅ. लाडे, पत्रकार भामा चु-हे उपस्थित होते.

