अर्जुनी मोर : तालुक्यातील सिलेझरी येथील जंगलात मोहफुले वेचणाºया एका महिलेवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ८ एप्रिल रोजीची आहे. वैशाली आदेश भैसारे (४०) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू आहे. गावाला लागून जंगलव्याप्त परिसर आहे. मोहफुलांचे जंगल म्हणून सिलेझरी परिसर ओळखला जातो. ग्रामीण भागातील लोकांना मोहफुले संकलित करुन रोजगार मिळत असतो. मोहफुलांची सर्वत्र मागणी असते. सध्या मजुरांच्या हाताला रोजगार नसल्याने गावाशेजारील जंगलात गावकरी मोठ्या प्रमाणात मोहफुले संकलित करण्यासाठी सकाळच्या वेळी जातात. सिलेझरी येथील आदेश भैसारे हे पत्नी वैशाली यांच्यासह सोमवारी पहाटे सिलेझरी बिटात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. दोघेही पती पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर मोहफुले वेचण्यात मग्न होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या अस्वलाने वैशाली भैसारे यांच्यावर हल्ला केला. तसेच, त्यांच्या उजव्या पायाचा चावा घेतला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड केल्याने पती धावत आले व अस्वलाला पिटाळून लावले. यानंतर लगेच जखमी पत्नीला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार केला. घटनेची माहिती होताच वन विभागाचे बाराभाटी क्षेत्राचे क्षेत्र सहायक विजय करंजेकर, बीट रक्षक नारायण फुकटे यांनी जखमी महिलेची विचारपूस करून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमी महिलेला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




