गोंदिया, दि.11 : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला वेळीच आळा घालण्यासाठी व महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून “लस आपल्या लेकीची, सुरक्षा तिच्या भविष्याची” या मोहिमेअंतर्गत एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
लसीकरण मोहिमेदरम्यान 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नोंदणी कशी करावी
ज्या मुलींनी वयाची 14 वर्षे पूर्ण केली आहेत परंतु 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुली लसीकरणास पात्र आहेत. लसीकरणासाठी पालकांनी आपल्या मुलींची नोंदणी केंद्र सरकारच्या U-WIN पोर्टलवर किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन करावी. लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळता येणे शक्य
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ‘एचपीव्ही’ लस या आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी उपाय असून ती 90 टक्क्यांहून अधिक संरक्षण प्रदान करते. ही लस सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
‘एचपीव्ही’ लस जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित असून पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणानंतर काही मुलींना सौम्य ताप किंवा इंजेक्शनच्या जागी सूज येऊ शकते, जी 2 ते 3 दिवसात बरी होते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.




