गोंदिया, दि.12 : प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी शासनातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा-1 राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत शनिवारी, 14 मार्च 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मंडळ स्तरावर या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित सेवा व विविध शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे व प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे हा आहे.
जिल्ह्यात येथे लागणार शिबीर
या अभियानांतर्गत शनिवारी, दि.14 मार्च रोजी गोंदिया तालुक्यातील कुडवा मंडळात टी.बी.टोली मैदान गोंदिया, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा मंडळात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मुंडीकोटा, गोरेगाव तालुक्यातील कमरगाव मंडळात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कमरगाव, देवरी तालुक्यातील देवरी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय भर्रेगाव, आमगाव तालुक्यातील कट्टीपार मंडळात ग्रामपंचायत कार्यालय घाटटेमणी, सालेकसा तालुक्यातील साकरीटोला मंडळात ग्रामपंचायत कार्यालय मक्काटोला, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव/देवी मंडळात सार्वजनिक रंगमंच बोंडगाव/देवी व सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय कोसमतोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लाभांचे स्वरुप
सदर शिबिरामध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी एक खिडकी व्यवस्था द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 व 8अ उताऱ्यांची दुरुस्ती व वितरण, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्रांचे वितरण, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सदन प्रक्रियेची माहिती, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुर करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा समाविष्ट असणार आहेत.



