रस्ते, मुतारी व पाणी टाकीच्या कामात लाखो रुपयांचा अपहार
गोंदिया: जिल्ह्यातील झालुटोला (खातीटोला) ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. स्वाती शंकरलाल टेंभरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून विविध विकासकामांचा निधी काम पूर्ण न करताच हडप केल्याचा ठपका तक्रारदाराने ठेवला असून, या संपूर्ण प्रकरणात सरपंच आणि त्यांचे पती दवनीवाडा पंचायत समितीचे सदस्य शंकरलाल बिसराम टेंभरे यांची अर्थपूर्ण ‘मिलीभगत’ असल्याचा खळबळजनक आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, प्रदिप धनलाल ठाकरे यांनी अपर आयुक्त, नागपूर विभाग यांच्याकडे सादर केलेल्या तक्रारीनुसार, खातीटोला येथील ‘मुन्ना जनबंधु ते हंसराज धारकर’ यांच्या घरापर्यंत ५ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर झाला होता. मात्र, प्रत्यक्षात रस्ते बांधकाम पूर्ण न करताच संपूर्ण शासकीय निधीची उचल करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची ही व्याप्ती एवढ्यावरच थांबली नसून, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ‘कांताबाई गजभिये ते पुष्पाबाई जनबंधू’ यांच्या घरापर्यंतच्या ३ लक्ष रुपयांच्या रस्ते कामातही मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे. हे काम पूर्ण न करताच त्याचे पूर्ण बिल काढण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, मौजा खातीटोला अंतर्गत बाजार चौक येथे ७८ हजार रुपयांचे मुतारी बांधकाम मंजूर झाले होते, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम न करताच बिल उचलण्यात आले. तसेच, अंगणवाडी केंद्रातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणीपुरवठा टाकी बसवण्याच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. टाकी व पाणीपुरवठ्याचे काम पूर्णतः न करताच मंजूर रक्कम संगनमताने उचलून शासनाची दिशाभूल केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या सर्व गैरप्रकारात सरपंचांचे पती हे स्वतः पंचायत समिती सदस्य असल्याने त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर आयुक्त, नागपूर विभाग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गोंदिया पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी (BDO) यांनी ११ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९(१) अंतर्गत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व संबंधित कामांची सविस्तर चौकशी आणि पाहणी पूर्ण केली आहे. यासंदर्भात खंड विकास अधिकारी श्री. देवरे यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी प्रकरणाची दखल घेत एका आठवड्यात आपला चौकशी अहवाल जिल्हा परिषदेत सादर करणार असल्याचे सांगितले. ३९(१) अंतर्गत झालेल्या या महत्वपूर्ण चौकशीतून काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे तक्रारकर्ते प्रदिप ठाकरे व सर्व ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत. आता प्रशासन सरपंच सौ. स्वाती टेंभरे आणि पं.स. सदस्य शंकरलाल टेंभरे यांच्या विरोधात काय ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Home गुन्हेवार्ता झालुटोला ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर? सरपंच आणि पंचायत समिती सदस्य पतीच्या ‘मिलीभगत’चे आरोप!





