गोंदिया : ‘होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो’ या जागतिक ब्रीदवाक्याला अनुसरून गोंदिया जिल्ह्यात जागतिक क्षयरोग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात भव्य प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली, तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ किटचे वाटप आणि निक्षय मित्रांचा सत्कार करून क्षयरोगमुक्त गोंदियाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातून निघालेल्या प्रभात फेरीने झाली. “क्षयरोग टाळा, आरोग्य जपा” अशा घोषणांनी शहर दुमदुमले होते. विशेष म्हणजे ‘आसार फाउंडेशन’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींतून क्षयरोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला. या कलाविष्काराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत क्षयरुग्णांना मदत करणाऱ्या ‘कनोजिया ब्रदर्स’ या निक्षय मित्रांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. कुसुमाकर घोरपडे म्हणाले की, क्षयरोग हा केवळ वैद्यकीय प्रश्न नसून सामाजिक लढा आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा नागरिक जागरूक होत नाही, तोपर्यंत आपण या आजाराचा पूर्णपणे नायनाट करू शकणार नाही. जनजागृती हेच सर्वात मोठे शस्त्र असून गोंदिया जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी क्षयरोगाचे वेळेत निदान आणि नियमित उपचार हाच यशाचा मार्ग असल्याचे सांगत नागरिकांनी भीती न बाळगता उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी ‘निक्षय’ योजना आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे क्षयरोगावर मात करणे सोपे जात असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, आरएमओ डॉ. बी.डी. जयस्वाल, आयईसी ब्युरो ऑफिसर विजय आखाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. निलेश जाधव, डॉ. श्रीमती गावंडे, डॉ. देव चंदेवार, डॉ. पवन राऊत, डॉ. राजेश बेलंबकर, डॉ. सचिन यूइके, डॉ. सचिन केलंका, प्रशांत खरात, अमित मंडल, डॉ. सलील पाटील, डॉ. सोनल कोटांगळे, सपना खंडाईत, प्रज्ञा कांबळे, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य जी.जी. येलंम, पी.एच.एन. चुटे, मेट्रन बिसेन, युवा आयकॉन अरुण बन्नाटे आणि जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home आरोग्य गोंदियाचा संकल्प: क्षयरोगमुक्त जिल्हा! जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनसंवादाचा जागरप्रभात फेरी आणि कलाकृतींतून...



