गोंदिया, दि.25 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रतात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असते. जिल्हातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज या कार्यालयामार्फत त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत पाठविण्यात आलेले आहे.
स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र अपलोड) करुन अर्ज दि.28 मार्च पुर्वी कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्थिती Approved दिसत आहे त्या विद्यार्थ्यांची स्वाधार योजनेंतर्गत लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरीत करण्यात येत आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता Send Back करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जा संबंधित माहितीसाठी कार्यालयाच्या 07182-234117 या दुरध्वनी क्रमांकावर, acswogondia@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क साधावा. इतर कोणाच्याही संपर्कात येऊ नये किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.




