– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई /गोंदिया, दि.2 – महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. त्यांच्या विनोदबुद्धी आणि भाषाशैली तसेच त्यांच्या साहित्यातून मिळणारा आनंद निखळ होता. कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकाचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्य, संस्कृती आणि भाषेमुळे होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, आमदार कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला एकादमीचे संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने नाटकाप्रती आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतात, देशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे. गायक, कवी, साहित्यिक, कवी आदी सगळ्यानी आपली कला, साहित्य, संस्कृती याचे जतन करून आपल्या लोकांचे जीवन समृद्ध केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पु.ल.अकादमी सारख्या वस्तू भविष्यात राज्यात तयार होतील. रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाला साजेशे काम इथे झालेले आहे. मात्र, हे सातत्य पुढे टिकले पाहिजे. अशी अपेक्षा मुखमंत्री फडणवीस व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने अत्यंत कमी वेळात या अकादमी आणि नाट्यगृहाचे नूतनीकरण केले आहे. रवींदनाथ टागोर आणि पु. ल. देशपांडे यांच्या नावाला साजेस काम याठिकाणी होत आहे. सध्या गावोगावी नाट्य मंदिराची अवस्था वाईट आहे. यासाठी संस्कृतीक कार्य विभागाने निधीची मागणी करावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार म्हणाले, “कला साधक मंडळींच्या साधनेची जागा म्हणजे ही पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर आहे. त्यामुळे ही एक पवित्र वास्तू असून, सर्वार्थाने पावित्र्य टिकवणारी वास्तू आहे. त्यामुळे सांस्कृतिक उन्नती करणारे कार्यक्रम येथे होतील. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट
महोत्सव 21 ते 24 एप्रिल 2025 ला पु. ल. अकादमीत होईल, अशी घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.शेलार यांनी यावेळी केली.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी या कार्यक्रमात प्रास्ताविक केले तर पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका श्रीमती मीनल जोगळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी चित्र प्रदर्शन, मिनी थियेटरचे क्लिप वाजवून तर पु.ल. कला अकादमीचे घंटानाद करून उदघाटन केले.
नूतनीकृत संकुलाची वैशिष्ट्ये
– रवींद्र नाट्य मंदिराच्या जुन्या इमारतीत आधुनिक सुविधा देत नवीन अंतर्गत सजावट व तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
– अत्याधुनिक सभागृह, खुले नाट्यगृह, नॅनो सभागृह, ऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्सची नव्याने उभारणी करण्यात आली आहे.
– लघु नाट्यगृहात डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणा, चित्रपट प्रदर्शन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.
– अकादमीत वादन कक्ष आणि सृजनकक्षही विकसित, तसेच पु.ल.देशपांडे यांचे स्मृतिदालन देखील सुरु करण्यात आले आहे.
– या ठिकाणी नवोदित कलाकारांसाठी नवीन २० अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
– जहांगीर आर्ट गॅलरीच्या दर्जाची आर्ट गॅलरी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
– एवढ्या दर्जेदार व्यवस्था असलेल्या देशातील नाट्यगृहांपैकी रवींद्र नाट्य मंदिर हे एक नाट्यगृह आहे.

