देवरी, (गोंदिया) : माणसाप्रमाणे सर्व प्राण्यांना या पृथ्वीतलावर जगण्याच्या अधिकार आहे. त्यामुळे समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या रुपाने कार्यरत हरीत सेनेने आपली जबाबदारी स्विकारुन पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे डीएफओ टी. एच. धमडेरे यांनी केले. स्थानिक शिवाजी संकूलामध्ये आज, 19 जुलै रोजी आयोजित वृक्षारोपन कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी संकूल उत्सव समिती व राष्ट्रीय हरित सेनेच्या इको क्लबच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे होते. प्रमुख अतिथी म्हणून आरएफओ ए. के. मडावी, खंडविकास अधिकारी सिंगणजुडे, कृषी विस्तार अधिकारी बी. यू. हुड, शिक्षण संस्थेचे सचिव अनिलकुमार येरणे, कोषाध्यक्षा जयश्री येरणे तसेच छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते. प्रसंगी छत्रपती शिवाजी संकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्यामधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. दरम्यान, मान्यवर व विद्यार्थ्यांनी रस्त्यालगत विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी सुद्धा झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली. प्रास्ताविक एम. जी. भुरे यांनी केले. संचालन एस. टी. मेश्राम व एस. टी. भांडारकर यांनी केले. आभार अश्मित पिल्लई यांनी मानले.

