Home Uncategorized नवेगावबांध येथील मुख्य रस्ता खड्ड्यात; डागडूजीवर होतो लाखोंचा चुराडा

नवेगावबांध येथील मुख्य रस्ता खड्ड्यात; डागडूजीवर होतो लाखोंचा चुराडा

62
0

नवेगावबांध, (गोंदिया) : नवेगावबांध येथील गावातून जाणारा मुख्य रस्ता आझाद चौक ते बस स्थानक दरम्यान व अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्याची चाळण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता खड्ड्यात आहे, की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वांनाच अग्निदिव्य करावे लागते. अशा प्रकारे हा अत्यंत गैरसोयीचा, संतापजनक सामना गेल्या काही महिन्यापासून स्थानिक व बाहेरगावच्या ये-जा करणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना खड्ड्यातून मार्ग काढीत सायकल चालवण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आहे. गेल्या दीड दोन वर्षापासून या रस्त्याची हालत खूपच खराब झालेली आहे. लवकरच नवीन रस्ता तयार करू,असे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नेहमीच सांगत असतात. मात्र नवीन रस्ता बांधकामाचे मुहूर्त काही निघेना, गाडी कुठे अडली आहे? हेही कळेना. दररोज शाळेच्या वेळेवर सकाळी व सायंकाळी शाळा सुटल्यावर या रस्त्यावर खूपच गर्दी असते. विद्यार्थी खड्डे वाचवीत या रस्त्याने जाणे-येणे करतात त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात गढूळ पाणी व चिखल साचलेले असते. त्यामुळे जाणा-या येणाऱ्या मोटर सायकल व चार चाकी वाहनामुळे पाणी अंगावर उडाल्याने नागरिकांचे कपडेही खराब होतात, विद्यार्थ्यांचे गणवेशही खराब होतात. हा प्रकार आता पावसाळाभर नित्याचाच झाला आहे. असे असताना ग्रामपंचायतची कुंभकर्णी झोप मात्र उघडत नाही. भर पावसातच ४-५ दिवसा अगोदर हेच खड्डे सिमेंट गिट्टीने रात्रीच्या वेळी बुजविण्यात आले. रोजच्या संततदार पावसामुळे सर्व खड्ड्यातील सिमेंट गिट्टी अक्षरश: वाहून गेली. लाखो रुपयाचा चुना अशाप्रकारे ग्रामपंचायत तिजोरीवर लागला आहे. उन्हाळ्यात हेच खड्डे मुरूम व मातीने बुजविले जातात. लाखोचे बिल काढले जातात, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे गढूळ पाण्याने व चिखलाने भरले असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. डागडुजीचे हे काम रात्रीच्या वेळेसच केले जाते. त्यावेळी या कामावर कोणीही जबाबदार व्यक्ती देखभाल करत नाही. त्यामुळे हे कामही व्यवस्थित केल्या जात नाही, असा आरोपही गावकरी करीत आहेत. रस्त्यावर थातूरमातूर मलमपट्टी करण्यापेक्षा नव्यानेच रस्त्याचे बांधकाम का केले जात नाही? असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. आझाद चौक ते बस स्थानक यादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल दुकानदार रस्त्यावर दुकान मांडत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक अडचणीचे असते. त्यातल्या त्यात यादरम्यानचा रस्ता अधिक खड्डामय झालेला आहे, नव्हे खड्ड्यातच रस्ता आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने भविष्यात घडणाऱ्या अपघाताची वाट न पाहता तसेच डागडूजीवर लाखो रुपयांचा चुराडा न करता या रस्त्याचे नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी गावात जोर धरीत आहे.

खड्ड्यामुळे अक्षरश: रस्त्याची चाळण…

नवेगावबांध हे तालुक्यातील एक मोठे गाव व बाजारपेठ म्हणून परिचित आहे. येथे पाच हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये आहेत. सभोवतालच्या गावातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येत असतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील अनेक गावातील हजारो नागरिक येथे रोज ये-जा करत असतात. असे असताना बस स्थानकापासून ते इंदिरानगर पर्यंत गावाला एकच मुख्य रस्ता आहे. हा रस्ताही ठिकठिकाणी खड्ड्यामुळे अक्षरश: रस्त्याची चाळण झालेली आहे.

मुख्य रस्ता नव्याने तयार करा….

दोन-तीन दिवसा अगोदर खड्ड्यात स्कुटी गेल्याने एक महिला जखमी झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दुकानदाराने सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून हा मुख्य रस्ता खड्डामय झाले असताना ग्रामपंचायत थातूरमातूर डागडुजी करीत असते. परंतु अपघाताची वाट पाहण्यापेक्षा गावातील एकमेव मुख्य रस्ता नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे.

दिवाळीपर्यंत मंजुरीची शक्यता….

रस्त्याला बरेच दिवस झाले आहेत.त्यामुळे खड्डे पडले आहेत. आम्ही दरवर्षी खड्डे बुजवितो.सध्या पावसाळा असल्यामुळे खड्डे नीट बुजत नाही. नवीन रस्त्याचा प्रस्ताव पाठविला आहे. दिवाळीपर्यंत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू केले जाईल.

विलास रामटेके, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत नवेगावबांध