Home गोंदिया जिल्हा नगर पालिकेची ‘इंजिन शेड शाळा’ तातडीने सुरू करा! आलोक मोहंती यांची नगरध्यक्षांकडे...

नगर पालिकेची ‘इंजिन शेड शाळा’ तातडीने सुरू करा! आलोक मोहंती यांची नगरध्यक्षांकडे मागणी

33
0

​गोंदिया: नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील ‘छोटी म्युनिसिपल-इंजिन शेड शाळा’ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ही शाळा तातडीने सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी युवा नेते आलोक मोहंती यांच्या नेतृत्वात नगर परिषद अध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले.
​प्रभाग क्रमांक १३ मधील ही महत्त्वाची शाळा बंद असल्याने परिसरातील शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालकांना आपल्या पाल्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागत असून, यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी व सरचिटणीस मनोज पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली ९ मार्च रोजी नगर परिषद अध्यक्ष सचिन शेंडे यांची भेट घेण्यात आली.
​यावेळी आलोक मोहंती यांनी मागणी केली की, ही शाळा पुनरुज्जीवित करून तिथे इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्यात यावे. यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल. नगर परिषद अध्यक्ष सचिन शेंडे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
​याप्रसंगी युवा नेते नेत्रदीप (गोल्डी)गावंडे, माजी NSUI जिल्हाध्यक्ष अमन तिगला, श्रीणू राव, श्री. हरिनखेडे, मनोज पटले, सिमोन बाघे, प्रांशु तिवारी, अदीप खान यांच्यासह प्रभागातील अनेक तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते