Home गोंदिया जिल्हा जिल्हा जय भिमच्या जयघोषाने गजबजला

जिल्हा जय भिमच्या जयघोषाने गजबजला

189
0

गोंदिया : विश्वरत्न, संविधान निर्माते, बोधीसत्व, भारतरत्न, क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. काल (ता.१३) पासून सुरू असलेल्या जयंती उत्सवामुळे गोंदिया जिल्हा जय भिमच्या जयघोषाने गजबजला होता. ठिकठिकाणी मिरवणूक तर कुठे संगीतमय कार्यक्रम, कुठे प्रबोधन तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले. यानिमित्त जिल्हा निळ्या रंगाने न्हाहून निघाला होता.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती आज (ता.१४) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक उत्सव समिती तसेच आंबेडकरी बांधव कामाला लागल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कालपासूनच जयंती उत्सवाला सुरूवा झाली. जयंती कार्यक्रमानिमित्त शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावांना निळे तोरण आणि झेंड्यांनी सजविण्यात आले होते. गोंदिया शहरातील आंबेडकर चौकात दोन ठिकाणी सार्वजनिक जयंतीनिमित्त मोठे मंडप उभारण्यात आले होते. दरम्यान दोन्ही ठिकाणी काल (ता.१३) रात्रीपासून संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मध्यरात्रीला १२ वाजताच्या सुमारास आंबेडकरी बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव फटाक्यांच्या आतिषबाजीनेही साजरा केला.


आज (ता.१४) सकाळपासून शहरासह जिल्ह्यात आंबेडकरी बांधवांची जयंती साजरी करण्यासाठी एकच धावपळ पहावयास मिळाली. पांढरे शुभ्र पोषाखावर निळा रंगाचा दुपट्टा, टोपी, फेटा अशा वेशभुषेत आंबेडकरी बांधव ठिकठिकाणी जयंतीनिमित्त उत्साहात दिसून आले. सकाळी १० वाजतापासून गोंदिया शहरात जयंती कार्यक्रमाला सुरूवात झाली. मुख्यत: शहरातील आंबेडकर चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कुतीला माल्यार्पण करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आंबेडकरी जनतेने एकच गर्दी केली होती. दुपारी १२ वाजतानंतर ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात हजारोच्या संख्येत जय भिमच्या निनादात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त बौध्द विहारात सर्वप्रथम बुध्दवंदना करण्यात आली. यानंतर आंबेडकरी बांधवांची शहरभ्रमणासाठी मोठ्या वाज्यागाज्यात रॅली काढण्यात आली. हजारोच्या संख्येत रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आंबेडकरी बांधवांनी डिजेच्या तालावर थिरकत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे आंबेडकर जयंती शांततेत साजरी व्हावी, यासाठी शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त पहावयास मिळाला. कुठेही अप्रिय घटना न घडता आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती ‘जय भिम’च्या निनादात जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
……………….
आंबेडकर चौकाला जत्रेचे स्वरूप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त स्थानिक आंबेडकर चौकातील पूणार्कृतीला अभिवादन करण्याकरीता शहरातील विविध भागातून आंबेडकरी बांधव मिरवणूकीसह दाखल झाले. दुपारी १ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंबेडकर चौकासह नेहरू चौक, जयस्तंभ चौक, गुरूनानक गेट, गांधी प्रतिमा, सुभाष गार्डन, नविन प्रशासकीय इमारत या सर्व भागांना यात्रेचे स्वरूप आले होते. जिकडे-तिकडे निळी टोपी, फेटे व पांढरे पोषाख परिधान करून आंबेडकरी महिला-पुरूष पहावयास मिळाले. गोंदिया शहरातील या मुख्य मागार्ला यात्रेचे स्वरूप आल्याने या मार्गावर दुपारी ४ वाजेपासून रात्रीपर्यंत वाहतुकही ठप्प पडली होती.