Home गोंदिया जिल्हा १३ हजार हनुमान चालिसा केंद्रातून हिंदू जागृति अभियान सुरू

१३ हजार हनुमान चालिसा केंद्रातून हिंदू जागृति अभियान सुरू

50
0

प्रवीण तोगडिया यांची माहिती

गोंदिया : देशातील गावागावांत हनुमान चालिसा केंद्र सुरू करण्यात येत असून या माध्यमातून हिंदू परिवारांना मोफत अन्नधान्याची मदत देणे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, रोजगारासाठी मदत करणे, २४ तास हेल्प लाईन सुविधा देण्यात येत आहे. आतापर्यंत १३ हजार हनुमान चालिसा केंद्र सुरू झाले असून जागृति अभियान सुरू आहे. या माध्यमातून धर्मांतरण व इतर अनेक समस्यांचे निराकरण होईल. लवकरच गोंदियातही याचा प्रारंभ होणार असून यासाठी सर्वच ठिकाणी हनुमान चालिसा विकास अधिकारी यांची नेमणूक केली जात असल्याचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगीतले. ते येथील हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष त्रिलोक शेंडे यांच्या निवासस्थानी १७ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मोतीलाल चौधरी, अस्मिता भट, किशोर डिकोंडवार, त्रिलोक शेंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तोगडिया पुढे म्हणाले, देव, देश, धर्म, समृद्ध हिंदू, दारिद्र्यमुक्त हिंदू, नोकरदार हिंदू, कर्जमुक्त शेतकरी, महागाईमुक्त कुटुंब इत्यादी मुद्द्यांवर हिंदूंना संघटित करण्यासाठी आणि देशाला एकापेक्षा जास्त मुद्यांवर संघटित करण्याचे काम संघटन करत आहे. अयोध्येतिल राम मंदिर निर्माणबाबत त्यांनी सांगीतले, १९८९ मध्ये ८ कोटी हिंदूकडून आम्ही सव्वा रुपयेप्रमाणे निधी संकलीत केला होता. त्यातून १९९० मध्ये दगड विकत घेवून कोरीव काम केले. २०२२ पर्यंत आम्ही ६० हजार घन फूट दगड तयार केले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर त्या दगडातूनच मंदिर निर्माण झाले. राम मंदिराची निर्मिती संपूर्ण देशाने लढा दिल्याने झाले. मंदिरासाठी देशातील हिंदूंना जागृत करण्यासाठी, १९८४ ते २०२४ या काळात १२ वेळा विविध उपक्रम घेतले. यात कारसेवा, राम शिला पूजन, राम जानकी यात्रा, राम नाम जाप आदींचा समावेश होता. राम हे कुणा एका पक्षाचे, व्यक्तिचे नाही तर सर्वांचे असल्याचे ते म्हणाले.
यापुर्वी तोगडिया यांनी स्थानिक रामदेवरा मंदिरात कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळाव्याला संबोधित केले. तसेच बापट लॉन येथे महिला मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शहरातील काही चाहत्यांच्या घरी भेटी दिल्या.