
मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत एक मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
नेत्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही
माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना जरांगे पाटील म्हणाले, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे.”


