Home गोंदिया जिल्हा महाराजस्व अभियानातून सुशासनाचे नवे पर्व – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानातून सुशासनाचे नवे पर्व – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

26
0

गोंदिया, दि.20 : समाजातील प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा विनाविलंब आणि पारदर्शक पध्दतीने मिळाव्यात यासाठी महसूल विभाग कटिबध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे केवळ सरकारी कामकाज नसून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सुशासनाचे नवे पर्व आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

टी.बी. टोली ग्राउंड कुडवा येथे आयोजित तालुकास्तरीय समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, सर्वश्री आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, हेमंत पटले, भेरसिंग नागपुरे, नाना पंचबुध्दे मंचावर उपस्थित होते.

श्री. बावनकुळे पुढे म्हणाले, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे महसूल विभागाचे काम आहे. प्रशासन गतिमान होण्यासाठी महसूल विभाग सर्वतोपरी कसोशीने काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे काम होत आहेत. शासन व प्रशासन गतिमान पध्दतीने काम करीत आहे. जमिनीच्या मोजणीच्या कामाचा व्याप लक्षात घेता, येत्या तीन महिन्यात गोंदिया येथे नविन भूमी अभिलेख कार्यालय सुरु करण्यात येणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. सद्यस्थितीत 500 फुटाचे पट्टे वाटप होत आहे ते येत्या काळात 1500 फुट करण्यात येणार. भविष्यात गोंदिया शहरातील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येईल. तुमची प्रॉपर्टी तुमच्या मोबाईलवर दिसून येईल, अशी योजना शासन स्तरावर तयार करण्यात येत आहे. झुडपी जंगल जमीनीबाबत नागरिकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांना धानाची प्रोत्साहन राशी मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या रेती घाटांचे लिलाव झाले नाही त्या रेती घाटांचे लिलाव करण्याचा सुध्दा निर्णय घेण्यात येणार असे महसूल मंत्री श्री बावनकुळे यावेळी म्हणाले. खासदार प्रफुल पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या कामाचे निराकरण होत आहे. या समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. गोंदिया व भंडारा हा धान उत्पादक जिल्हा असून पूर्व विदर्भाचा आधार आहे. त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी सर्वश्री आमदार विनोद अग्रवाल, विनोद रहांगडाले, संजय पुराम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात ‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत 20 लाभार्थ्यांना पट्टे वाटप, 5 ब्रास मोफत रेती पासेस, भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 प्रमाणपत्राचे वाटप, डिजिटल 7/12 प्रमाणपत्र वाटप व कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतीशी निगडीत औजारे यामध्ये ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले असून यामध्ये 1 लाख 25 हजार रुपयाची सबसिडीच्या स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या योजनांचे 50 दालन लावण्यात आले होते. या दालनावरुन पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. ‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत 4190 पट्टे वाटप करण्यात आले. समाधान शिबिरात 654 फेरफार निकाली काढण्यात आले. जिल्ह्यात समाधान शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत 13 हजार 912 पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार तसेच सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी विविध विभागाचे माहिती परत आलं उभारण्यात आले होते. थेट लाभ मिळावा यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होती.