तिरोडा : गुप्त माहितीच्या आधारे तिरोडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारे दोन पिकअप वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत ८ बैलांची सुटका करण्यात आली असून, वाहनांसह एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी पहाटे २:१६ ते २:४० च्या सुमारास तिरोडा पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये बैलांना अत्यंत निर्दयीपणे, अमानवीय पद्धतीने आणि दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले. पहिल्या कारवाईत आरोपी अनिकेत जयहरी मुले (वय १९, रा. उदनापुर, ता. लोणार, जि. बुलढाणा) याच्या ताब्यातून महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-28 BB-7936) जप्त करण्यात आली, ज्यामध्ये ८० हजार रुपये किमतीचे ४ बैल आढळले. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी कृष्णा भास्कर बळी (वय २४, रा. साखरखेडा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-12 MV-5482) मधून ८० हजार रुपये किमतीचे आणखी ४ बैल जप्त करण्यात आले.
या दोन्ही कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ८ बैल आणि १२ लाख रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ई) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५, ६ व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची तक्रार पोलीस उपनिरीक्षक शुभम बालकृष्ण नष्टे यांनी दिली असून, पोलीस नायक क्रमांक ११९४ यांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नष्टे स्वतः करीत आहेत.




