Home करिअर नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना ‘एकस्तर’ वेतनश्रेणी लागू

नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना ‘एकस्तर’ वेतनश्रेणी लागू

8
0

जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची घोषणा
​अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ६ ऑगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली ‘एकस्तर’ वेतनश्रेणी आता एस-१३ ऐवजी एस-१४ या सुधारित स्वरूपात लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केली आहे. सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षक संघ महिला शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
​यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष भेंडारकर म्हणाले की, २९ फेब्रुवारी २०२४ च्या शासन शुद्धीपत्रकानुसार ही वेतनश्रेणी लागू करण्यात येत आहे. सुमारे २४ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे विशेषतः नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्या या प्रयत्नांचेही भेंडारकर यांनी विशेष कौतुक केले. या निर्णयाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही शिक्षक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.
​आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिक्षक संघ नेहमीच अग्रेसर आहे. जिल्ह्यातील सामान्य शिक्षकांची शिक्षक संघावर असलेली निष्ठा व विश्वासामुळेच जटील समस्यांचे निराकरण करणे शक्य होत असल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राहुल कोंतमवार व करुणा हटकर यांनी केले. सूत्रसंचालन सत्यवान गजभिये व सुरेश आमले यांनी तर आभार प्रदर्शन अंजली शिवणकर व श्यामा कुंडगीर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.