सडक अर्जुनी: तालुक्यातील पळसगाव डवा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात आलेली वृक्ष लागवड पूर्णपणे बोगस ठरली असून, खड्डे न खोदता लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे. सामाजिक वनीकरण विभाग देवरी व कोहमारा कार्यालय अंतर्गत पळसगाव ते मुरुपार राम या दोन किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी २० एप्रिल २०२२ रोजी १६ लाख ७१ हजार २९७ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. या वृक्षांच्या संगोपनासाठी ५ हजार ३५८ मनुष्यबळ दिवसांचे नियोजन करून मजुरीचा मोठा निधीही काढण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्यावर आज ५ टक्के देखील झाडे अस्तित्वात नाहीत.
सुरुवातीला केवळ वृक्ष लागवडीचा दिखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात मजुरांची बोगस हजेरी लावून आणि जास्त मजूर दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. खड्डे न खोदताच मजुरीची देयके काढण्यात आल्याने या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन शहानिशा करावी आणि सामाजिक वनीकरण विभागाचे बीट गार्ड, क्षेत्र सहाय्यक, वनक्षेत्र अधिकारी तसेच ग्रामपंचायत रोजगार सेवक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पळसगाव ते मुरुपार राम येथील संतप्त नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.




