महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगपासून संरक्षण करण्यासाठी HPV लस मोफत द्या तसेच जिल्हानिहाय कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करून द्या : राजकुमार बडोले
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे केंद्र सरकारच्या मोफत HPV लसीकरण मोहिमेसह राज्यात कॅन्सर व्हॅन वाढवण्याचे आश्वासन
मुंबई, २४ फेब्रुवारी २०२६: गर्भाशयाच्या कर्करोगापासून महिलांना वाचवण्यासाठी HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लस शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करावी आणि ग्रामीण भागात कर्करोग लवकर ओळखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग स्क्रीनिंग व डिटेक्शन मोबाईल व्हॅन उपलब्ध करावी, अशी महत्त्वाची मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांनी जोरदारपणे मांडली. १८ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळत असून, HPV लस बाजारात उपलब्ध असतानाही अनेक रुग्ण दिसून येत आहेत. ग्रामीण भागात, विशेषतः गोंदिया जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल भागात कर्करोग तिसऱ्या किंवा उशिरा स्टेजमध्ये कळतो, जेव्हा उपचारासाठी वेळ निघून गेलेली असते. महिलांच्या आरोग्याच्या या गंभीर मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत लक्ष वेधले आणि शासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच HPV लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ९ ते १४ वयोगटातील मुलींना निशुल्क HPV लस देण्यात येईल, ज्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात प्रतिबंध होऊ शकेल. तसेच, कर्करोग स्क्रीनिंगसाठी मोबाईल व्हॅनची संख्या वाढवण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर डिटेक्शन व्हॅन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.
आमदार राजकुमार बडोले यांच्या या मागणीमुळे ग्रामीण भागातील महिलांना लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना मिळण्यास मदत होईल. नियमित स्क्रीनिंग आणि लसीकरणामुळे गर्भाशयाचा कर्करोग पूर्णपणे रोखता येऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. आमदार बडोले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या या घोषणांमुळे महिलांच्या आरोग्य सुधारणेसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे.
