दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील रस्ता १० वर्षांपासून दुर्लक्षित
लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने विकासाचा बोजवारा
सडक अर्जुनी : तालुक्यातील पिपरी रेती घाटावर तस्करांचा माफियाराज सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. बिनधास्तपणे रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक होत असल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. याचा फटका गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला सडक अर्जुनी-सौंदड-सुंदरी हा मार्ग मागील १० ते १५ वर्षांपासून प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर रेती तस्करांचे साम्राज्य असून, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
सौंदड ते सुंदरी हा अवघ्या ३ किमीचा रस्ता असून, तो गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर येतो. सौंदड-पिपरी रोडच्या टी-पॉईंटपासून ५०० मीटरवर जिल्हा सीमा सुरू होते. श्रीराम नगर येथील शेतकर्यांची शेतजमीन याच भागात असल्याने सुंदरी ते परसोडी हा पांदण रस्ता त्यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांत या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था इतकी भीषण होते की, नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. परसोडीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने येथील वाहतूक मोठी आहे, पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या मार्गाच्या दुरवस्थेचे मुख्य कारण ‘पिपरी रेती घाट’ असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या अंधारात या मार्गावरून ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी केली जाते. चारगाव फाटा, उकरा फाटा, वीरसी, मुख्य सातलवाडा आणि कोसमतोंडी मार्गे पांढरीकडे जाणारी ही अवजड वाहने रस्त्यांची अक्षरशः वाट लावत आहेत. मुख्य महामार्गावरील कारवाई टाळण्यासाठी तस्कर या अंतर्गत ग्रामीण मार्गांचा वापर करतात, ज्याचा फटका थेट स्थानिक जनतेला आणि रस्ते विकासाला बसत आहे.

हा रस्ता गोंदिया आणि भंडारा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येतो. मात्र, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा परिषद सदस्य याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. ‘एकीकडे शासन रस्ते विकासाचे मोठमोठे दावे करते, तर दुसरीकडे जिल्हा सीमेवरील या महत्त्वाच्या रस्त्याकडे साधे ढुंकूनही पाहत नाही,’ असा संतप्त सवाल सौंदड आणि सुंदरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.या मार्गावरील अवैध रेती तस्करी तातडीने थांबवावी, जड वाहनांना बंदी घालावी आणि सुंदरी-परसोडी पांदण रस्त्यासह मुख्य मार्गाचे नूतनीकरण करावे. अन्यथा, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गावकर्यांनी दिला आहे.
………………
‘अर्धे तुमचे, अर्धे आमचे’ – भ्रष्टाचाराचा उघड खेळ
गावकर्यांमध्ये अशी चर्चा आहे की, या भागातील काही लोकप्रतिनिधीच आता कंत्राटदार झाले आहेत. जिथे गरज नाही अशा चांगल्या सुस्थितीत असलेल्या डांबरी रस्त्यांवर सिमेंट रोडचे बांधकाम करण्यासाठी लाखो रुपये मंजूर केले जातात. ‘अर्धे तुमचे आणि अर्धे आमचे’ या तत्त्वावर संगनमताने निधी लाटला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. खर्या गरजू आणि खराब झालेल्या बायपास रस्त्यांकडे दुर्लक्ष करून, केवळ जिथे मलिदा मिळतो अशाच कामांकडे या लोकप्रतिनिधींचे लक्ष असल्याचे बोलले जात आहे.





