गोंदिया : गोरेगाव येथील पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास दोन युवकांचा मृत्यू झाला. कादीर मतीन शेख (वय 28), केफ अमीन शेख (वय 21 दोघेही रा. सडक अर्जुनी) अशी मृतांची नावे आहेत. भारत बंद असल्याने कादीर मतीन शेख व केफ अमीन शेख हे चुलबंद जलाशय येथे सहलीकरिता आले होते. चुलबंद जलाशयाचे अतिरीक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्याजवळ असतानाच एकाचा तोल धबधब्यात गेला. त्यात मोठा डोह असल्याने त्यात बुडत असताना दुसरा वाचविण्यासाठी धावला. पण यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी मुरदोली गावात पसरली. नागरिकांनी या धबधब्याकडे धाव घेतली. धबधब्यात डोह असल्याने ही माहिती पोलिस पाटील दिलीप मेश्राम व वनपरिक्षेत्रअधिकारी यांना देण्यात आली. पोलिस पाटील मेश्राम यांनी गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पण बुधवारी गोरेगाव बंद असल्याने पोलिस बंदोबस्तात होते. सायंकाळ झाल्याने दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले.

