गोंदिया : शहरातील कन्हारटोली येथील रंजीत प्रेसजवळ राहणारे रवींद्र पांडुरंग सुरसाऊत (वय 40) कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत 26 जुलै रोजी रात्री 10 वाजता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून बेडरूम मधील गोदरेज आलमारीतील लॉकर तोडून सोन्याचे दागिने किंमत 54 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २० ऑगस्ट रोजी करण्यात आली.आरोपी रितिक ऊर्फ दद्दू प्रदीप वासनिक (वय 22, रा. मलपुरी (टेकरी) ता. तिरोडा) व हर्ष ऊर्फ एक्का महेंद्र रामटेके (वय 23, रा. खैरलांजी रोड रेल्वे चौकी जवळ, गौतम बुद्ध, वॉर्ड तिरोडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून सोन्याची अंगठी, नथ, मंगळसूत्राचे सोन्याचे पदक, एक जोडी बिरी, 8 नग गहूमणी असा एकूण किंमत 45 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार पोलिस हवालदार सुनीलसिंह चव्हाण, छत्रपाल फुलबांधे, राजेश भगत, कपिल नागपुरे, उमेश भानारकर, चालक संदीप घरोटे यांनी केली.

