आमगाव-सालेकसा राज्य महामार्गाची दुरावस्था : बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आमगाव, (गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजल्या जाणारा आमगाव-सालेकसा-दरेकसा राज्य मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या राज्य मार्गावर ‘नजर हटी दुर्घटना घटी’ ही म्हण खरी ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
आमगाव सालेकसा राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. सालेकसा तालुक्यातून आमगावला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच सालेकसा तालुक्यात फारश्या रोजगाराच्या संधी नसल्याने रोजगारासाठी देखील मोठ्या संख्येने नागरिक आमगावला येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. या राज्य महामार्गावर आमगाव गुरुदेव नगर पासून तर सालेकसापर्यंत अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांना वाव मिळाले आहे. या महामार्गावर रात्रीचे प्रवास धोक्याचे ठरत आहे. अंधार वाटेत मार्गक्रमण करताना मार्गावरील पावसाचे पाणी भरलेले खड्डे अंदाज चुकवीत आहेत. त्यामुळे वाहनांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. या मार्गावरील पूर्वीच वाघ नदी वरील पुल धोक्याचे ठरले आहे. पुलाला कंपन सुटले असून पुल कधी कोसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु याकडे प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. यातच या मार्गावरील खड्डे या अपघातांना आमंत्रण देत आहेत. या मार्गावरील आंतरराज्यीय दळणवळण यंत्रणा मात्र खंडित होऊन पुढे जात आहे. त्यामुळे वाहन धारक व नागरिक या मार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.

