अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील घटना
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील माधव काशीराम नेवारे यांच्या घरतील गॅसचा भडका उडाला असल्याने गॅसच्या हंड्याला एका बाजूने फट पडल्याने आगीचा भडका उडाला. यामध्ये नेवारे यांचा घर जळून खाक झाला. माधव नेवारे हे धान रोवणी कामाचे मुख्य असल्याने शेतकऱ्यांकडील रोवणीच्या कामाचे मजुरांचे मजुरी देण्याकरिता पैसे त्यांच्याकडे जमा करण्यात आले होते. आगीच्या भडक्यात घरात ठेवलेले मजुरीचे 34 हजार रुपये असलेली पूर्ण रक्कम तसेच त्यांच्या मुलाकडील 7 हजार रुपये असे एकुण 41 हजार रूपए जळाले आहेत. घरातील जीवनावश्यक वस्तू पूर्णता खाक झाल्याने नेवारे कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्जुनी/मोरगाव येथील इंडियन गॅस एजन्सी कडून गॅस हंडा घेऊन चहा बनविण्याकरिता गॅसचा वापर करण्यात आला. गॅसचा अचानक स्फोट झाल्याने पूर्ण घर जळाले. विशेष म्हणजे, मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यामधून निघण्यासाठी मार्ग मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली. गॅस हंडे पुरवणाऱ्या गाडीतून हंडा ग्राहकांना देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही, असा आक्रोश जनतेकडून व्यक्त केला जात आहे. झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

