Home Uncategorized पीएम इंटर्नशीप योजना

पीएम इंटर्नशीप योजना

17
0

      गोंदिया, दि.4 : देशातील युवकांना प्रत्यक्ष व्यवसाय करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्यातील कौशल्य विकसीत करावीत व यातूनच त्यांना रोजगारक्षम बनवावे यासाठी भारत सरकारने ‘पीएम इंटर्नशीप योजना’ सुरु केली आहे. पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष कामातील फरक युवकांना कळावा ही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून योजनेस सुरुवात केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये देशातील 500 कंपन्यांच्या माध्यमातून 1 कोटी युवकांना रोजगारक्षम बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे. योजनेमधून युवकांना 12 महिन्यासाठी कंपनीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल व या काळात त्या युवकाला प्रति महिना 5 हजार रुपये रक्कम दिली जाईल. यामुळे युवकांची नोकरी मिळवण्याची योग्यता वाढेल. एखाद्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रात नोकरी करण्या अगोदर त्या क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काही दिवसांचे प्रशिक्षण घेणे म्हणजेच इंटर्नशीप होय.

         पीएम इंटर्नशीप योजनेसाठी पात्रता : यासाठी 21 ते 24 वयोगटातील अर्जदार पात्र असतील (अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशीचे वय ग्राह्य धरले जाईल). अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. अर्जदार पूर्ण वेळ विद्यार्थी किंवा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा. मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारे किंवा ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.

         पीएम इंटर्नशीप योजनेचे फायदे : डीबीटी (Direct Benefit Scheme) नुसार लाभार्थींना दर महिन्याला 5 हजार रुपये प्रमाणे 12 महिन्यांसाठी मदत दिली जाईल. यातील 500 रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थीला कंपनी मार्फत त्यांच्या नियमानुसार CSR funds मधून देईल. ज्यावेळी कंपनी 500 रुपये लाभार्थ्याच्या खात्यात टाकेल तेव्हा शासन 4 हजार 500 रुपये लाभार्थ्याच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे वर्ग करील (यासाठी आधार कार्ड व बँक खाते NPCI लिंक असावे लागते). याव्यतिरिक्त एखाद्या कंपनीला लाभार्थ्याला 500 किंवा 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायची असेल तर ते स्वत:च्या funds मधून देऊ शकतात. प्रशिक्षणार्थी इंटर्नशीपसाठी रुजू झाल्यावर एकदाच 6 हजार रुपये शासन DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्याला देईल. प्रत्येक लाभार्थ्याचा ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा’ योजना आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना’ योजनेंतर्गत विमा उतरवला जाईल. सदरील दोन्ही विमा योजनांचा हप्ता शासन भरेल.

         पीएम इंटर्नशीप योजना कशी राबवली जाईल : PM Internship Portal (mca.gov.inया अधिकृत संकेतस्थळावरुन सर्व कार्यपध्दती राबवली जाईल. संकेतस्थळावर कंपन्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी, इंटर्नशिपचा प्रकार, इंटर्नशिपची जागा, शैक्षणिक पात्रता, कंपनीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा इत्यादी माहिती देण्यासाठी सोय केली जाईल. पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. लाभार्थ्याने दिलेल्या शैक्षणिक व इतर माहितीच्या आधारे संकेतस्थळ लाभार्थ्याचा resume बनवेल. पात्रतेनुसार, आवडीनुसार प्रशिक्षणार्थी 5 जागांसाठी अर्ज करु शकेल.

        प्रशिक्षणार्थीची निवड : संकेतस्थळावरील प्रत्येक इंटर्नशीप संधीसाठी लाभार्थ्याचा एक गट निवडला जाईल. लाभार्थ्यांची निवड त्याने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार व कंपनीच्या गरजेनुसार केली जाईल. निवड सर्वसमावेशक असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अपंगांसह सर्वांना योग्य संधी मिळेल. उपलब्ध संधीच्या 2 ते 3 पटीत लाभार्थ्यांची शिफारस शासन कंपनीला करेल. कंपनी त्यांच्या गरजेनुसार, पात्रतेनुसार, पध्दतीनुसार लाभार्थ्यांची निवड करेल. कंपनी लाभार्थ्यांना इंटर्नशिपसाठी ऑफर लेटर संकेतस्थळावरुन देईल. लाभार्थ्याला एक फेरीत दोन इंटर्नशीप ऑफर मिळू शकतात. मग लाभार्थ्याने संकेतस्थावरुन कंपनीला ऑफर लेटर स्वीकारल्याचे कळवावे. ऑफर लेटर स्वीकारल्यावर संकेतस्थळावर आपोआप इंटर्नशीप कागदपत्रे तयार होतील ज्यात कंपनी आणि प्रशिक्षार्थीचे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत माहिती असेल.