गोसाई, कोकणा, चिंगी ग्रामवासीयांचा इशारा
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील चिंगी ते गोसाई, कोकणा पर्यंत असलेल्या रपट्याची निर्मिती 20 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने शाळकरी विद्यार्थी एवं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रपट्यावर नवीन पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असा ईशारा गोसाई, कोकणा, चिंगी ग्रामवासीयांनी संबंधित विभाग एवं लोकप्रतिनिधींना दिला आहे.
सडक अर्जुनी तालुक्याच्या टोकावर असलेल्या गटग्रामपंचायत खोबा अंतर्गत गोसाई, कोकणा, चिंगी हे गाव येत असून गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर आहेत. भंडारा जिल्ह्यात वांगी गाव असून कोहमारा-नवेगावबांध मार्गावरून पश्चिम दिशेला वांगी ते सोनका, पळसगाव, सुकळी, वळद, सावरबंध हा मार्ग 15 किमी. असून साकोली येथे जाण्यासाठी कमी अंतराचा आहे. या मार्गावर रात्रं-दिवस वर्दळ असते. खोबा गावारून ७००मी.वर लहान रपटा असून मागील 20 वर्षापासून चिंगी ते गोसाई, कोकणा या रपट्यावर पाणी राहत असल्याने पावसाळ्यात जाणे-येणे बंद असते. 20 वर्षाआधी गोंदिया जिल्ह्याचा समावेश भंडारा जिल्हा असल्याने तालुक्याचे ठिकाण साकोली आहे. पण गोंदिया जिल्हा वेगळा झाल्याने चिंगी व गोसाई कोकणा हे गाव सडक अर्जुनी तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून येथील नागरिक व शाळकरी मुलांचा सडक अर्जुनी तालुका व गोंदिया जिल्ह्याशी संबंध आहे. गोसाई, कोकणा या गावात 50 कुटूंब असून 307 लोकसंख्या आहे. तसेच चिंगी गावची कुटूंब संख्या 200 असून लोकसंख्या हजाराच्या वर आहे. या दोन्ही गावात वर्ग 1 ते 4 पर्यंत पजि.प.प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थी 15 किमी. अंतरावरील नवेगावबांध तर काही 8 किमी. अंतरावरील कोकणा जमींदार तर काही विद्यार्थी सडक अर्जुनीला जातात. नवेगावबांध येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी कोकणा चिंगी वरून 5 किमी.पश्चिम दिशेला सालई येथील रेल्वे बोगद्यात पावसाळ्यात 4 ते 5 फुट पाणी भरला राहत असल्याने विद्यार्थ्यांना 15 ते 20 दिवस शाळेला दांडी मारावी लागते. परंतु दरवर्षी पेक्षा यावर्षी 2024 मध्ये 22 जुलैला अतिवृष्टी झाल्याने व नवेगावबांध तलावाचे ओव्हरफ्लो सुरू आहे. त्यामुळे तलावातील येणारा पाणी हा त्याच नाल्यामधून जात खोबा, चिंगी रपट्यावर 4 ते 5 फुट पाणी रोडावरून वाहत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना व परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी जाणारा मार्ग बंद झाला आहे. या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मागिल 20 वर्षात दोन वेळा जि.प.सदस्य व लोकप्रतिनिधी यांनी या समस्येकडे लक्ष दिले नाही, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या रपट्यावर पुलाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे, अन्यथा येणा-या विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ईशारा किसान आघाडी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष धनजंय आसटकर, उपसरपंच सोपान लांजेवार, माजी सरपंच सिंधू मेश्राम, धनलाल शेंडे, किशोर राऊत, छोटेलाल मेश्राम, तुळशिदास डोंगरवार, हनवंत गडपायले, अनिल भेंडारकर, गुलाब बहेकार, भुपेंद्र शेंडे, काशिनाथ कापगते पोलीस पाटील यांनी दिला आहे.

