Home Uncategorized तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

115
0

प्रोत्साहन भत्ता काढण्यासाठी मागितली लाच

गोंदिया : कंत्राटी आरोग्य परिचारिकेचा एनसीडीच्या माध्यमातून मिळणारा प्रोत्साहन भत्ता काढण्यासाठी लाच मागणार्‍या गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज (ता.1) जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. सुरेश रामकिशोर शरणागत (वय 36) असे लाचखोर कंत्राटी लेखापालाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या गिधाडी उपकेंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका हिने रितसर एनसीडीचे प्रोत्साहन भत्तासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव स्वरूप मिळणार्‍या 16 हजार 500 रूपयाचे देयक काढण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कंत्राटी लेखापाल सुरेश शरणागत याने आरोग्य सेविकेला 3 हजार रूपयाची लाच मागितली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्यसेविकेने गोंदिया लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणाची शहनिशा केली असता आरोपी सुरेश शरणागत हा पदाचा दुरूपयोग करून लाच मागत असल्याचे समोर आले. दरम्यान तडजोडी अंती अडीच हजार रूपये लाच देण्याचे ठरले. तसेच आरोपीने लाच स्विकारण्याचीही तयारी दर्शविली. आज (ता.1) सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष आरोपी शरणागत याला अडीच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही सापळा कारवाई तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक राहुल माकनीकर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात पोनि उमाकांत उगले, अतुल तवाडे, सफौ कर्पे, संजय बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, अशोक कापसे, वैâलास काटकर, संतोष बोपचे, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, रोहिणी डांगे, दिपक बाडबर्वे यांनी केली.