सालेकसा, (गोंदिया) : रस्ते विकासाला प्रेरक ठरले असले तरी सालेकसा तालुक्यातील रस्ते यासाठी मारक ठरत आहेत. अन्य ॠतुत खड्डेमय रस्त्याने त्रास सहन करीत नागरिक दळणवळण करीत असले तरी पावसाळ्यात हे रस्ते जीवघेणे ठरतात. यंदाही पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहूल अशी तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची अनेक वर्षांची ओरड आहे. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी विकासाचे आश्वासन देतात. मात्र त्यातील किती पूर्ण होतात, हे तालुक्यातील खड्डेमय रस्त्यावरुन दिसून येते. ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. उन्हाळा व हिवाळ्यात नागरिक त्रास सहन करीत प्रवास करतात. मात्र पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होत असल्याने प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व चिखलमय रस्त्यांमुळे अपघात नित्याचे झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

